ईडीच्या नोटिशीनंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सुचना

0
557

मुंबई, दि. २० (पीसीबी) – ईडीच्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व २२ ऑगस्ट रोजी ‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.   

ईडीच्या नोटीशीनंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच  ट्विट  करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळे  २२ ऑगस्टला शांतता राखा. कुणीही ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचे आहे, ते योग्य वेळी बोलेनच,  असे राज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोहिनूर गैरव्यहार प्रकरणी  ‘ईडी’ने राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून मनसेने २२ ऑगस्ट रोजी ‘ईडी’च्या कार्यालयावर  मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.  राज्यभरातील मनसैनिकांना ‘ईडी’च्या कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  मात्र,  राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना  शांतता राखण्याचे आवाहन करून ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमू नका, अशा सुचना केल्या आहेत.