‘इव्हीएम’वरच फेरमतमोजणी; केवळ मतदानाच्या खात्रीसाठी व्हीव्हीपीएटीवरील चिठ्ठ्या   

0
772

पुणे, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या  (इव्हीएम) पारदर्शकतेवर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची प्रक्रिया ही ‘व्होटर व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रायल’ (व्हीव्हीपीएटी) या प्रणालींद्वारे होणार  आहे. मात्र,  फेरमतमोजणीचा प्रसंग उद्‌भवल्यास  ‘इव्हीएम’मशीनवरून मतांची फेरमोजणी करण्यात येणार आहे.

‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीमध्ये मतदारांना  मिळणारी चिठ्ठी ही केवळ पसंतीच्या उमेदवाराला मत मिळाले की नाही,  याची मतदारांना खातरजमा करण्यासाठी दिली जाणार आहे.   फेरमतमोजणीची वेळ आल्यास चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार   नाही.

‘ईव्हीएम’ मशीनबाबत सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत. या मशिनमध्ये फेरफार करण्यात येत असल्याने ठरावीक उमेदवार विजयी होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘व्हीव्हीपीएटी’मध्ये प्रिंटरप्रमाणे एक उपकरण ‘ईव्हीएम’ मशिनला जोडले  जाते. त्यामुळे मतदाराने ‘ईव्हीएम’ मशिनवर बटन दाबल्यानंतर एक चिठ्ठी येते. त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्रम आणि निवडणूक चिन्ह दिसते. ही माहिती असलेली चिठ्ठी मतदारांना दहा सेकंद बघता  येते. त्यानंतर ती चिठ्ठी मशिनच्या एका बॉक्समध्ये पडते. याममुळे  मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत पडले आहे का,  याची खात्री करता येणार आहे.

मात्र, आगामी निवडणुकीमध्ये फेरमतमोजणी करण्याची वेळ आल्यास ‘ईव्हीएम’ मशीनवरील मतांचीच मोजणी केली जाणार आहे. ‘व्हीव्हीपीएटी’वरील चिठ्ठ्यांची मोजणी केली  जाणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे फेरमतमोजणीसाठी ‘ईव्हीएम’चाच वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.