इराणने अमेरिकेवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास इराणला नष्ट करू; अमेरिकेची धमकी

0
572

न्यूयॉर्क, दि. २० (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इराणला नष्ट करु अशी धमकीच ट्रम्प यांनी टि्वटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करु. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंम्मत करु नका असे ट्रम्प यांनी खडसावले आहे.

पुढच्या काही दिवसात अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिकेने आखाताच्या समुद्रात आपल्या युद्धनौका आणि बी-५२ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इराकी गटांकडून धोका असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने अनावश्यक राजनैतिक कर्मचारी वर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे.

रविवारी बगदादच्या ग्रीन झोन हाऊसिंगमधील सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर रॉकेट डागण्यात आले. यात अमेरिकन दूतावासाचाही समावेश होता. या हल्ल्यामागे कोण आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोलटॉन हे इराण विरोधात कठोर भूमिका घेण्याच्या मताचे आहेत तर प्रशासनातील अन्य व्यक्ती त्या विरोधात आहेत.