Desh

इम्रान यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य- अमित शहा

By PCB Author

March 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी निषेध केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एका कार्यक्रमात सांगितले. एका वृत्तवाहिनीला सांगताना ते म्हणाले, की मोदी सरकारने दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या मनात पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करून धडकी भरवली आहे.

पुलवामा हल्ल्यावर इम्रान खान यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते म्हणाले, की पाकिस्तानी पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा बाळगणे गैर आहे. तेथील परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात नसली तरी त्यांनी किमान पुलवामा हल्ल्याचा तोंडी निषेध करायला हवा होता.

भारताचा पाकिस्तानने पकडलेला वैमानिक अभिनंदन वर्धमान याच्या सुटकेची पाकिस्तानने केलेली तयारी हा भारताचा राजनैतिक विजय आहे. अगदी कमी काळात अभिनंदनच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आम्ही तयार केले आहे. वर्धमान चालवत असलेले मिग २१ विमान पाकिस्तानने पाडले होते. त्याआधी भारताने पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडले होते. अभिनंदन वर्धमान हा पाकिस्तानच्या ताब्यात होता, त्याची सुटका करण्याची घोषणा इम्रान खान यांनी गुरुवारी त्यांच्या संसदेत केली होती.

विरोधकांवर टीका करताना शहा म्हणाले, की विरोधकांनी जो संयुक्त ठराव केला त्यामुळे पाकिस्तानला भारताविरोधात बोलण्यासाठी आयता दारूगोळा मिळाला. भाजप सरकार देशातील सैन्य दलांच्या त्यागावर राजकारण करीत आहे, असा खोटा आरोप विरोधकांनी केल्याने पाकिस्तानला आनंदाच्या उकळय़ा फुटल्या. मोदी सरकार दहशतवाद खपवून घेणार नाही, असा  संदेश पाकिस्तानला गेला आहे व तसे करण्याची राजकीय इच्छाशक्ती असल्याचेही आम्ही दाखवून दिले आहे.