Desh

इम्रान  खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती

By PCB Author

August 18, 2018

इस्लामाबाद, दि. १८ (पीसीबी) – पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान  खान यांनी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून आज (शनिवार)  शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सकाळी पावणेअकरा वाजता इस्लामाबादमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.  पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी इम्रान  खान यांनी शपथ दिली.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सिद्धू हे या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते. सिद्धू यांच्याशिवाय  माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनादेखील शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण होते. मात्र,  वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आमंत्रण नाकारल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धू यांनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना काश्मिरी शाल भेट दिली आहे. तसेच भारताचा सदिच्छादूत या नात्याने आपण पाकिस्तानसाठी प्रेमसंदेश घेऊन आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सिद्धू म्हणाले की, मी माझ्या मित्राच्या आमंत्रणामुळे पाकिस्तानात आलो आहे. माझ्यासाठी हा क्षण खुप  विशेष आहे. खेळाडू आणि कलाकार देशांमधील अंतर मतभेद मिटवतात. मी पाकिस्तानात प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे.