Videsh

इम्रान खानला शांततेचा नोबेल पुरस्कार द्या; पाक संसदेत प्रस्ताव

By PCB Author

March 02, 2019

इस्लामाबाद, दि. २ (पीसीबी) – पाकिस्तानने जागतिक रोषापासून दूर राहण्यासाठी  आणि  भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तान सरकारने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव पाकच्या संसदेत सादर करण्यात आला आहे.

पाकपुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’  या दहशतवादी संघटनेचे तळ भारतीय हवाई दलाने उद्‌ध्वस्त  केले होते. त्यानंतर पाकनेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.  यावेळी भारताचे मिग-२१ हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. या विमानातील पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. पायलट अभिनंदन यांना मारहाण झाल्यामुळे तणाव आणखी वाढला होता.

पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता होती. पंतप्रधान मोदी यांनी तसे संकेत दिले होते. त्यामुळे बिथरलेल्या इम्रान खान यांनी शांततेचे आवाहन करत भारतीय वैमानिकाला सुखरूप सोडण्याची घोषणा केली होती.