Maharashtra

इम्तियाज जलील यांचे आदित्य ठाकरेंना खुले पत्र

By PCB Author

December 23, 2018

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – औरंगाबाद शहरात रस्ते, वीज, पाणी यांच्यासह प्रदुषण आणि कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  शहराच्या या बकाल अवस्थेला शिवसेना जबाबदार आहे, असे आपल्याला नाही वाटत का?’ असा सवाल करणारे  थेट पत्र एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे. शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. औरंगाबादच्या या बकाल अवस्थेस शिवसेना जबाबदार आहे, असे आपल्याला नाही वाटत का?’ असा सवाल जलील यांनी केला आहे.

या पत्रातील भावना माझ्या एकट्याचा नसून तमाम औरंगाबादकरांच्या आणि औरंगाबादवर निस्सीम प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या आहेत, असे जलील यांनी लिहिले आहे. तसेच औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करत असून आपणही पक्षीय विरोध विसरून एकत्र यावे, असे आवाहन जलील यांनी आपल्या या पत्रद्वारे केले आहे.