इतर राज्यात आपत्ती आली की, बॉलिवूड कलाकार मदत करतात. मात्र महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही…

0
383

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : संपूर्ण राज्यात धुवाँधार पाऊस पडतोय. राज्यांतल्या अनेक शहरांत पूर आलाय. पावसामुळे अघटित घटना घडल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत जवळपास 110 नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. शासन पातळीवर, स्वयंसेवी संस्थांकडून मदतकार्य तर सुरु आहे, पण इतरवेळी लोकं ज्यांना आयडॉल मानतात ते कलाकार मंडळी या मदतकार्यात कुठेही दिसत नाहीत. किंबहुना त्यांनी राज्यातल्या भीषण परिस्थितीवर साधं ट्विट करण्याची तसदीही घेतली नाही. याच कलाकार मंडळींचे कान पकडत मनसेने मदतीचं आवाहन केलं आहे.

‘इतर राज्यात काही आपत्ती आली की बॉलिवूड कलाकार मदत करतात. मात्र महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही. माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा’, असं आवाहन मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना केलं आहे.

 

‘इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं… अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत… अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्‍यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी.’