इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही – राज ठाकरे

0
669

सोलापूर, दि. १६(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हालचाली रशियाच्या धर्तीवर सुरू आहेत. ते दोघे देशाला मोडीत काढत आहेत. ज्यांच्यावर मी विश्वास टाकला होता, त्या मोदींनीच केसाने गळा कापला. इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही,’ अशा शेलक्या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. सोमवारी सायंकाळी सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. अच्छे दिन आणि विकासाच्या गप्पा मारणारे मोदी आणि शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून गेली पाहिजेत. या दोघांबद्धल माझ्या मनात प्रचंड राग असल्यानेच मी माझ्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीत उभा नसताना प्रचारात उतरलो आहे. मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलो नाही. मोदी-शहा या जोडगोळीला हटविण्यासाठी मोदींना मदत होईल, अशा कोणाला ही मतदान करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

ठाकरे म्हणाले, ‘मोदी आणि शहा देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे आकडे लपविले आहेत. प्रसार माध्यमांची गळचेपी केली आहे. इतकेच नव्हे तर शहीद जवानांचे फोटो लावून भाषणे करण्यात येत आहेत. नोटबंदीमुळे सुमारे ४ ते ५ कोटींहून अधिक लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. देशभरातील नागरिकांनी संपूर्ण बहुमतात सरकार हातात देऊनही त्यांनी देशभरातील जनतेची घोर निराशा केली. मोदी आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सुमारे १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.’

बाबासाहेबांच्या स्मारकांची एक वीटही रचली नाही

इंदू मिलमधील जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र पाच वर्षांत एक वीटही रचली नाही. स्मारकाची संकल्पना माझी होती. या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाचनालय व ग्रंथालय होण्याची अपेक्षा होती. यामुळे जग ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी येईल. नुसते पुतळे उभा करणे म्हणजे स्मारक नव्हे. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक करण्यापेक्षा महाराजांचे खरे स्मारक गड आणि किल्ले आहेत, ते नीट बनवा, त्यांचा नवीन पिढी आदर्श घेईल, असे काम करा.

मोदींच्या फेक जाहिरातींचा हिशेब द्या

सरकारने बेरोजगारांना काम दिल्यास प्रामुख्याने मराठा मुला-मुलींना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार नाही. मतांसाठी आरक्षणाच्या नावावर दोन समाजात भांडणे लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे हा सरकारचा उद्योग आहे. एखादी गोष्ट घडली की, दुसरी घटना घडवायची आणि पहिल्या घटनेकडे जाणीवपूर्वक जनतेचे लक्ष्य विचलित करायचे, असा उद्योग सुरू आहे. भाजप सरकार माझ्या जाहीर सभांच्या खर्चाचा हिशोब मागतोय. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने ४ हजार ८८० कोटी फेक जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार? असा सवालही ठाकरे यांनी भाजपला विचारला. माझ्या खर्चाची चिंता त्यांनी करू नये, असेही त्यांनी सुनावले. भाजपने आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ न करता उद्योजकांची अडीच लाख कोटींची कर्जे माफ केली. परदेशातून काळा पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख टाकणारे गेले कुठे, असा सवाल ही त्यांनी केला.

डिजिटल ‘हरिसाल’ गावचा गोपालकृष्ण व्यासपीठावर

भाजप सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हरिसाल हे गाव डिजिटल झाल्याचे दाखविले होते. या गावात ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून खरेदी व्यवहार केले जात असल्याचे व २४ तास वायफाय, एटीएम मशीन, मोबाइलचा वापर आदींवर फोकस करीत गावातील एका तरुणाला जाहिरातीत दाखविले होते. या डिजिटल गावाची पोलखोल राज ठाकरे यांनी केली. या डिजिटल जाहीरातीमधील गोपाकृष्णाला चक्क व्यासपीठावर आणून हा तरुण नोकरीसाठी पुणे शहरात भटकंती करीत असल्याचे निदर्शनास आले, असता मनसे कार्यकर्त्यांनी त्याला माझ्या संपर्कात आणल्याचे सांगत मोदी सरकारच्या खोट्या डिजिटल योजनेचा पर्दाफाश केला.

राज यांच्याकडून मोदींचा खोटारडेपणा उघड

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणा आणि न केलेल्या अंमलबजावणीचा पंचनामा केला. मोदींच्या भाषणातील विसंगती त्यांनी हजारो सोलापूरकरांसमोर चव्हाट्यावर आणली. मोदींनी जाहीर सभांमध्ये केलेल्या आधी व नंतरच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून मोदींची पोलखोल केली. याद्वारे मोदी कसे खोटे बोलत आहेत, हे राज यांनी पुराव्यासह चित्रफितीद्वारे पटवून सांगितले.