इंस्टाग्राम पोस्टमधील टॅगमधून काढण्यास सांगितल्याने मुलीच्या पालकांनी मुलाच्या भावाला केली जबर मारहाण

0
1064

चिखली, दि. १२ (पीसीबी) – मुलीने वर्गात शिकणाऱ्या एका मुलाला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये टॅग केले. मुलाला हे टॅग न आवडल्याने त्याने मुलीला फोन करून ते टॅग काढण्यास सांगितले. मात्र या गोष्टीवरुन चिडून जाऊन मुलीच्या पालकांनी मुलाच्या मोठ्या भावालाच जबर मारहाण करुन जखमी केली. ही घटना रविवारी (दि. १०) रात्री नऊच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

मनीष महेंद्र भट्ट (वय २५, रा. साने चेंबर्स, साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नायर, हेमंत सोनार, सुनील सोनार, ललित सोनार (सर्व रा. रामनगर, चिंचवड) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ महेश भट्ट  आणि आरोपीची मुलगी सोनिया नायर हे दोघेजण एकाच वर्गात शिकतात. सोनियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट तिने महेशला टॅग केली होती. मात्र महेश याला ते आवडले नाही आणि त्याने फोन करुन सोनिया हिला टॅग काढण्यास सांगितले. यावरून सोनियाच्या पालकांनी आणि अन्य तीन जणांनी मिळून महेश याचा भाऊ फिर्यादी मनीष यांना चिखली येथील घरी जाऊन फायटरने डोक्यात, डाव्या हाताला खांद्याजवळ मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी या सर्वांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.