इंधन दरवाढीचा मार, एसटीचे भाडे पुन्हा महागणार

0
448

मुंबई, दि.४ (पीसीबी) – इंधनदरातील सततच्या वाढीने खासगी वाहनचालक, रिक्षा-टॅक्सीप्रमाणेच एसटी महांमडळही मेटाकुटीस आली आहे. दरवाढीने प्रवासी दुरावतील ही शक्यता असूनही वाढीव इंधन खर्चावर मार्ग काढण्यासाठी महामंडळाने १८ टक्क्यांपर्यंतच्या भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही वाढ किमान १० टक्क्यांपर्यंत राहील, असा कयासही मांडला जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच महामंडळाने १८ टक्क्यांची भाडेवाढ लागू केली होती. 
ऑक्टोबरमध्ये डिझेलचा दर ७१ रु. ८७ पैशांवर गेला असून एप्रिलमध्ये डिझेलसाठी प्रति लीटर ६३ रु. ७६ पैसे इतका दर मोजावा लागत होता. या वाढीव दराने महामंडळाच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेवाढीचा उपाय शोधला जात आहे. महामंडळास दररोज सरासरी १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेलची आवश्यकता आहे. त्यानुसार एसटीस दर वर्षास डिझेलसाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये मोजावे लागतात.
या पार्श्वभूमीवर महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे. भाडेवाढीसाठी प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला जातो. तिथे मान्यता मिळाल्यानंतरच भाडेवाढ लागू होते. महामंडळाने यापूर्वी १५ जून रोजी १८ टक्के वाढ केली होती. त्यास तीन महिने उलटत नाहीत तोच पुन्हा नवीन भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.