इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे शहरातील ‘हा’ पुल पाण्याखाली

0
486

चिखली, दि. 24 (पीसीबी) : मावळ तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दोन दिवसांपासून इंद्रायणी दुथडीभरून वाहत आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून इंद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला जोडणारा मोई-चिखली पूल दोन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.

इंद्रायणी नदीपात्रा लगत असणाऱ्या मोई, कुरुळी, मोई, मोशी येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. परिसरातील ग्रामपंचायतीना पाणी पुरवठा करणाऱ्या विहरी पाण्याखाली गेल्या आहेत. परिसरात दोन दिवसापासून संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चाकण वाहतूक पोलिसांनी व मोई ग्रामपंचायतीने इंद्रायणी नदी पूल वाहतुकीसाठी पूर्ण पणे बंद केला आहे.

इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी गाठली असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोई, कुरुळी, चाकण एमआयडीसी या गावांना पिंपरी चिंचवड शहराशी जोडणारा मोई येथील इंद्रायणी नदीवरील कमी उंची असलेल्या पुलावरून पाणी वाहत असून हा रस्ता बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. मोई -चिखली पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली आहे. इंद्रायणीवरील बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत.