Pune Gramin

इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा करणा-यांवर कारवाई : 91 लाखांचा मुद्देमाल जप्त

By PCB Author

April 13, 2022

चाकण, दि. १३ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालुम्ब्रे येथे इंद्रायणी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत असलेल्या एका टोळीवर तलाठी पथकाने कारवाई केली. यात तब्बल 91 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) रात्री दीड वाजता करण्यात आली.

याप्रकरणी तलाठी विष्णू रूपनवर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवैधरीत्या वाळू उपसा करत असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुम्ब्रे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरु असल्याची माहिती तलाठी फिर्यादी विष्णू रूपनवर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अवैधरीत्या वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा मारून कारवाई केली.

तलाठी आणि त्यांच्या पथकाने कारवाई केल्याची चाहूल लग्नात आरोपी पळून गेले. यात 45 लाखांचे एक पोकलेन, 22 लाखांची एक जेसीबी आणि 24 लाखांचे तीन ट्रॅक्टर असा एकूण 91 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.