इंद्रायणी नदीकाठी सुरू होता मटका जुगार; पोलिसांनी छापा मारताच….

0
233

देहूगाव, दि. ५ (पीसीबी) – इंद्रायणी नदीकाठी येलवडी देहूगाव येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यात पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) दुपारी करण्यात आली. ज्ञानेश्वर महादेव आवटे (वय 35), विठ्ठल पंढरीनाथ सुकने (वय 42), नामदेव साहेबराव उपाडे (वय 32), कृष्णा कांबळे (वय 30, सर्व रा. चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई मारुती करचुंडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येलवाडी देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर अवैधरीत्या कल्याण मटका नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यात पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिठ्ठ्या, कार्बन, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण 31 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चार जणांवर गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.