इंद्रायणी थडीने महिलांच्या टॅलेन्टला संधी दिली – अमृता फडणवीस

0
657

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – प्रत्येक स्त्री शुर असते. तिला आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. ती संधी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून हजारो महिलांना उपलब्ध झाली, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोमवारी (दि. ११) भोसरी येथे व्यक्त केले.

शिवांजली सखी मंच आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित इंद्रायणी थडीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, संयोजिका पूजा महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, कामगार नेते सचिन लांडगे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे, ई क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा भीमाताई फुगे, क क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा नम्रता लोंढे आदी उपस्थित होते.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “इंद्रायणी थडीत शूर सैनिकांचा गौरव करुन देशप्रेमाची भावना सर्वांमध्ये प्रज्वलीत करण्यात आली. तसेच अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताईंना मदतीचा धनादेश दिला. यातून लांडगे कुटुंबियांनी सामाजिक उत्तरदायित्व स्विकारल्याचे दिसते. त्यांची ही वाटचाल इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. इंद्रायणी थडीमध्ये सहभागी बचत गटांना आता कर्ज पुरवठा, कौशल्य विकास, उत्पादन, विपनण व मार्गदर्शन मिळाले पाहिजे. स्त्रियांनी देखील आता उंबरठा ओलांडून आपले विचार व आपले गुणकौशल्य समाजापुढे मांडले पाहिजेत. यातूनच भक्कम राष्ट्राची उभारणी होईल. आपली परंपरा जपतच मॉडर्न झाले पाहिजे.”

अमृता फडणवीस यांच्या हस्ते सिंधूताई सपकाळ यांना ५१ हजारांचा धनादेश देण्यात आला. शुर सैनिकांचा आणि सहभागी बचत गटांचा सत्कार अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार महेश लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन विजय फुगे यांनी केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.