इंदुरीकर महाराजांच्या समर्थनासाठी आमदार महेश लांडगे उतरले मैदानात

0
859

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – भोसरीतील मोशी या ठिकाणी शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.

कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर महाराजांच्या सोबत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर उभे आहे. महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू, असा एल्गार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

महेश लांडगे म्हणाले की, वारकरी सांप्रदायाचा पताका खांद्यावर घेवून हभप. इंदुरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य केले आहे. माझ्यासरख्या असंख्य तरुणांना वारकरी सांप्रदाय आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा महाराजांच्या कीर्तनातून मिळाली आहे. त्यांच्या कीर्तनाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विनोदी भाषेत प्रबोधनाची शैली निवृत्ती महाराजांकडे आहे. पण, त्यांच्या कीर्तनातील एखाद्या वाक्यांचा आधार घेत आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल, बदनामी होईल, असे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडकर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी या सोहळ्यानिमित्त इंदुरीकर महाराज यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली आहे. यावेळी माजी महापौर राहुल जाधव आणि भाजपाचे नेते-पदाधिकारी उपस्थित होते.