इंटरनेट फुकट देणार असाल,  तर मग रेशनही फुकट द्या – उध्दव ठाकरे

0
911

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – डिजिटल इंडियामुळे नागरिकांची पोट भरणार नाहीत. त्यासाठी फोनवर दाखवण्यासाठी नव्हे, तर ताटातही असायला पाहिजे. इंटरनेट फुकट देणार असाल,   तर मग रेशनही फुकट द्या,  असा उपरोधिक  सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीला अप्रत्यक्षरित्या दिला.  

मुंबईत आज (शनिवार)  केबल मालक संघटनांच्या आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.

जिओ फायबर विरोधात केबल संघटनांनी एल्गार पुकारला आहे. या संघटनांना पाठींबा देण्यासाठी मी उपस्थित राहिलो आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लढा देण्याची आमची तयारी आहे.   संघटनेला बळ मिळावे, म्हणून येथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जिओ फायबरमुळे केबलचालकांना भीती  वाटणे सहाजिक आहे. मात्र, केबल चालकांचे कष्टाने उभे राहिलेले  व्यवसाय उद्ध्वस्त होऊ देणार नाही. इंटरनेट पहिल्यांदा फुकट द्यायचे, त्यानंतर  प्रतिस्पर्धी  कंपनी डबघाईला आली की,  नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे.

मोफत द्यायचे असेल ५० वर्षांचा करार करून मोफत सेवा द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.  केवळ मोबाईलवर दाखवून पोट भरणार  का?, ताटात काहीच नसेल तर अशा डिजिटल इंडियाचा काय उपयोग?  कोणाला व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. आणखी १० जणांनी या व्यवसायात उतरावे.  परंतु  कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.