white shape of body and blood stains on asphalt texture

Chinchwad

इंजिनिअर तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

By PCB Author

July 09, 2020

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका इंजिनिअर तरुणाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सअॅपला याबाबतचे स्टेटस् ठेवले होते. मात्र, कोणत्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय पोतदार (वय २४, रा. चिखली, साने चौक. मूळ गाव – वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सोसायटीतील इमारतीवरून उडी घेत अक्षयने आत्महत्या केली, तिथे तो राहण्यास नव्हता.

दरम्यान, आई, बाबा आणि बहीणला सांभाळ मी दुसऱ्या जगात जात आहे, अशा आशयाचे व्हाट्सअॅप स्टेटस् त्याने आत्महत्येपूर्वी ठेवले असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अवघ्या २४व्या वर्षी त्याने आपले जीवन संपवल्याने त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. लॉकडाउन झाल्यापासून तो सातारा येथील वाई या मूळ गावी गेला नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अक्षय हा चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहण्यास होता. तो एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील ‘वुड्स व्हिला’ फेज तीन सोसायटीत तो आला. या इमारतीच्या टेरेसवर काम असल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगत त्याने चावी मागितली. परंतु, सुरक्षा रक्षकाने चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळ वाट पाहून दुसरा सुरक्षा रक्षक येताच इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये जायचे असल्याची नोंद करून त्याने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावर जाऊन तेथून थेट खाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, ज्या फ्लॅटची नोंद त्याने रजिस्टरमध्ये केली तो गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.