Others

इंग्लंडचा सामना करण्याची आमची मानसिक तयारी

By PCB Author

June 15, 2021

ब्रिस्टॉल, दि.१५ (पीसीबी) : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी आम्ही मानसिककदृष्ट्या तयार आहोत. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याची प्रेरणा महत्वाची ठरल्याचे भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील एकमेव कसोटी लढत बुधवारपासून (ता.१६) सुरू होत आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि टी २० सामन्यांची मालिकाही खेळविली जाणार आहे.

या सामन्यापूर्वी आजच्या सराव सत्रानंतर हरमनप्रीत कौर हिने पत्रकारांशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘आम्ही फार कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. मी तर दोनच कसोटी सामने खेळले आहे. या वेळी आम्हाला अजिंक्य रहाणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पाच दिवसाच्या सामन्यात कशी फलंदाजी करायची हे आम्ही रहाणेकडून शिकलो. आम्ही त्याच्यापासून प्रेरणा घेतली

हरमनप्रीत स्वतःला एकदिवसीय क्रिकेटची खेळाडू मानते. ती म्हणाली,’एकदिवसीय क्रिकेट जास्त खेळलो असलो, तरी आम्ही लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी खूप सराव केला आहे. आम्ही योग्य पद्धतीने सराव करत आहोत. जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुमच्याकडून चांगले क्रिकेट खेळले जाते. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ करण्याचा प्रयत्न करू.’

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर झालेला संवाद खूप महत्वाचा ठरेल. रहाणेकडे खूप अनुभव आहे. त्याने आम्हाला अनुभवाचे बोल दिले. कसोटीत तेही इंग्लंडमध्ये कशी फलंदाजी करायची याविषयी रहाणेने महत्वाच्या टिप्स दिल्या, असेही तिने सांगितले.

संघ निवडीच्या कुठल्याही प्रश्नात ती अडकली नाही. शेफालीच्या पदार्पणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरमनप्रीत म्हणाली,’शेफालीची निवड करायची की नाही हा संघ व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. ते तिचा खेळ पाहून निर्णय घेतील. ती प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व शकते. नैसर्गिक गुणवत्ता असलेली ती खेळाडू आहे. तिची खेळण्याची शैली आणि तंत्र याविषयी बोलणे योग्य नाही.’

भारतीय खेळाडूंनी येथील हवमानाशी जुळवून घेणे महत्वाचे आहे, असे सांगून ती म्हणाली,’आम्ही खूप वर्षांनी लाल चेंडूचा सामना करणार आहोत. आम्हाला त्यासाठी फारसा सराव मिळालेला नाही. अर्थात, तेवढा वेळही मिळाला नाही. त्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेणे आम्हाला आवश्यक आहे. येथील खेळपट्टीचे स्वरुपही वेगळे असते. आज जशी असेल, तशी ती उद्याही असेल असे कुणी सांगू शकत नाही. यासाठी देशांतर्गत क्रिकेटही लाल चेंडूवर खेळायला मिळणे आवश्यक आहे. कदाचित या मोसमात हा बदल घडू शकेल.’