आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंचितांचे लसीकरण आणि रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे वाटप

0
353

पुणे, दि.१० (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरूडकरांसाठी वाढदिवस आप’लसं’ करणारा ठरला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी १३०० वंचितांचे लसीकरणाची व्यवस्था केली आहे. तर २००० रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे वाटप केले आहे.

आ. चंद्रकांतदादा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस अतिशय अभिनव पद्धतीने आणि समाजपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे नको, वंचितांसाठी लस आणि रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट देण्याचा संकल्प केला होता.

त्यानुसार आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूडमधील रिक्षाचालकांना १००० रुपयाचे सीएनजी कुपन्सचे वाटप केले होते. याचा लाभ २००० रिक्षाचालकांना घेतला. तर कोथरूड मध्ये कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी वंचितांच्या लसीकरणासाठी १३०० जणांना कुपन्सचे वाटप केले होते.

त्यापैकी रिक्षाचालकांना पौंड रोड येथील साई-सयाजी पेट्रोल पंप येथून सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते यापैकी काही रिक्षाचालकांना सीएनजी भरण्यासाठी कुपन देण्यात आले. तर कोथरूड मधील संजीवनी हॉस्पिटल शेजारील धोंडो मामा कर्वे कॉलेज येथे दोन दिवस लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरु करण्यात आले. यावेळी लसीकरण झालेल्या पहिल्या व्यक्तीस आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

लसीकरण आणि रिक्षाचालकांना आर्थिक पाठबळ याबाबतची भूमिका स्पष्ट करताना आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांनाच फटका बसला. मात्र, त्यातही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना याची सर्वाधिक झळ सहन करावी लागली. यापैकी काहींना पुन्हा आपल्य पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रिक्षाचालकांना मदतीचा एक हात दिला. त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांना मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र, समाजातील काही घटकांचे जलद लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज दोन्ही उपक्रम राबविले जात आहेत.”

यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस दीपक पोटे, गणेश घोष, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, लसीकरण केंद्रावर कोथरूड मंडल महिला मोर्चाच्या वतीने आ. चंद्रकांत दादा पाटील यांचे औक्षण करुन, त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, माधुरी सहस्रबुद्धे, कोथरूड मंडलाचे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, पल्लवी गाडगीळ, सुरेखा जगताप, शितल गुंड, गायत्री काळभोर, केतकी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.