Pimpri

आस्था सोशल फाउंडेशनच्या मुलांसोबत रक्षाबंधन

By PCB Author

August 10, 2022

पिंपरी, दि. १० (पीसीबी) : दिव्यांग बांधवांच्या प्रति केवळ मदत, सहकार्य, सहानुभूती अशी भावना न ठेवता त्यांच्या हातात मदतीचा, ठोस सहकार्याचा हात ठेवत त्यांचे साथी होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी मंगळवारी व्यक्त केले. तसेच, आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अंध बांधवांसाठी शाळा तसेच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अंध बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘आस्था सोशल फाउंडेशन’ या संस्थेतील अंध बांधवांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. अंध बांधवांनी तयार केलेल्या राख्यांचे सादरीकरण यावेळी आयुक्तांसमोर करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष अनिल भांगडीया, आस्था सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पराग कुंकलोळ, माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, प्रा.सविता नाणेकर, दिपा मुरकुटे, रोहिनी वारे आदी उपस्थित होते. सुलक्षणा धर म्हणाल्या की, मला तीन वर्षांपूर्वी आस्था संस्थेची माहिती कळाली. मी त्या संस्थेस भेट दिली असता या संस्थेच्या माध्यमातून अंधदृष्टीहीन बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कलागुणांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसून आले. राख्या बनविणे, सीड बॉल्स, आकाश कंदील, पणत्या, पेपर बॅग्स बनविण्याच्या माध्यमातून हे दृष्टिहीन बांधव स्वावलंबी झाले आहेत. आज या बांधवांनी बनवलेल्या राख्यांच्या माध्यमातून आयुक्तांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

‘‘‘ दिव्यांग बांधवांच्या समस्या त्यांच्या अडचणी प्रत्येक नागरिक व प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजेत. लहान असताना मुलांमध्ये अपंगत्वाची, अंधत्वाची जाणीव निर्माण झाल्यास तातडीने पालकांनी याकडे लक्ष द्यावे. नेत्रदान सारखी प्रक्रिया अत्यंत किचकट आहे.ती सुटसुटीत होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. नेत्रदानाची मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. यातूनच आपल्या या अंध बांधवांच्या, दिव्यांगांच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील. प्रशासन या दृष्टीने मी नक्कीच विचार करेल. हे बांधव आपल्या समाजासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यांनाही नवीन जग बघण्याची संधी उपलब्ध होईल यासाठी नेत्रदानातून त्यांना मदतीचा हात आपण दिला पाहिजे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले