Desh

आसाराम बापूंचा पुत्र नारायण साई बलात्कार प्रकरणी दोषी; मंगळवारी शिक्षा सुनावणार     

By PCB Author

April 26, 2019

सूरत,  दि. २६ (पीसीबी) – बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साई याला जहांगीरपुरा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आज (शुक्रवार)  दोषी ठरवले.  त्याला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे, असे  सूरत सत्र न्यायालयाने सांगितले.

आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात सूरतमधील बहिणींनी बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात नारायण साईला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले.  पोलिसांनी पीडित बहिणींचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. आसारामविरोधात गांधीनगरमधील कोर्टात खटला सुरू आहे. नारायण साईविरोधात न्यायालयाने आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.

दरम्यान, नारायण साईविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भूमिगत झाला होता. तो सतत   ठिकाणे बदलत होता. सूरतचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी साईला अटक करण्यासाठी ५८ पथके तयार केली होती.  गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी डिसेंबर २०१३ रोजी साईला हरयाणा-दिल्ली सीमेजवळ अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.