आसाम पूर; ‘वाहने चालवताना वन्यजीवांची काळजी घ्या’- रोहित शर्मा

0
532

आसाम, दि. १८ (पीसीबी) – आसाम राज्यात सध्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पुरात काही जण मरण पावले असून ४.२३ लाख लोक बाधित झाले आहेत. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला असून तेथील वन्यजीव आसऱ्यासाठी रस्त्यांवर आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून वन्यजीवांची काळजी घेण्याचे आवाहन टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने केले आहे.

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर रोहितने चिंता व्यक्त केली. या पुरामुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांनी त्यांचे हक्काचे घर गमावले आहे. त्यामुळे ते सध्या आसऱ्यासाठी रस्त्यावर आलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांनी वाहने चालवताना वन्यजीवांचा विचार करावा आणि वाहने सावकाश व जपून चालवावी असे आवाहन त्याने केले आहे.