आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही – अमित शाह

0
571

नवी दिल्ली, दि. ९ (पीसबी) – गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी गुवाहाटी येथील ईशान्य लोकशाही आघाडी (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स) च्या मेळाव्याप्रसंगी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्र सोडले. काँग्रेसने कायमच ईशान्य भारताला देशापासून वेगळे पाडले असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच, एनआरसीवरून बोलताना केवळ आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

गृहमंत्री शाह यांनी म्हटले की, प्रत्येक राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही भावना तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी ईशान्य भारताला काँग्रेसमुक्त बनवणे महत्वाचे होते. आज मी हे आनंदाने सांगू शकतो की ईशान्य भारतातील आठही राज्य ‘एनईडीए’ बरोबर आहेत. काँग्रेसने ईशान्य भारतात कायमच फोडा आणि राज्य करा ही नीती अवंलबवली व संपूर्ण देशापासून ईशान्य भारतास वेगळे पाडले असल्याचा आरोपही गृहमंत्री शाह यांनी यावेळी केला.

स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत काँग्रेसने ईशान्य भारतात भाषा, जात, संस्कृती, हद्दी या मुद्य्यांवरून भांडणे लावली. यामुळे संपूर्ण ईशान्य भारत कायमच अशांत राहत होता. या ठिकाणी विकास करण्या ऐवजी भ्रष्टाचार केला गेला. येथील दहशतवादाची समस्या सोडवण्या ऐवजी काँग्रेसने त्याला वाढीसाठी पोषक वातारण तयार केले व आपले राज्य कायम राहील यासाठी तेढ निर्माण करा व राज्य करा हे धोरण अवलंबवले असल्याचाही गृहमंत्री शाह यांनी आरोप केला.