आषाढी वारीला आमचा ‘पांडुरंग’ आमच्या सोबत नसेल; फुंडकरांच्या शोकप्रस्तावावेळी खडसेंच्या भावना

0
423

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे येत्या आषाढीच्या वारीला आमचा पांडुरंग आमच्या सोबत राहणार नाही, अशा शब्दांत माजी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी फुंडकरांच्या शोकप्रस्तावावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य, यवतमाळचे माजी आमदार बापूसाहेब पानघाटे, दगडू बडे (पाटील) या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘शेतीच्या प्रश्नांवर भाऊसाहेबांना विशेष आस्था होती. आपल्या ताकदीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्थान निर्माण केले. राज्यात भाजपचा सर्वदूर प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कृषिमंत्री म्हणून त्यांनी पीक विमा, कृषी संजीवनीसारख्या योजना प्रभावी पद्धतीने अमलात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनाने भाजपचे आणि राज्याचेही मोठे नुकसान झाले. ‘कृषिमंत्री म्हणून झालेली टीका त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतली. भाऊसाहेबांसारखा संयमीपणा मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याने शिकायला हवा,’ असा सल्ला विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी या वेळी दिला.