Pimpri

आषाढी एकादशी दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून “हरित वारी… आपल्या दारी” उपक्रम

By PCB Author

June 24, 2020

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कोरोना व्हायरसमुळे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यांच्यासह राज्यातून अनेक मानाच्या पालख्या आणि मोजक्याच भाविकांना आषाढी एकादशी दिवशी पंढरीची वारी करता येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक व भाविकांनी आपल्या दारात, परिसरात व प्रभागात एक वृक्ष लावा आणि त्यात पांडूरंग पाहावा. आषाढी एकादशीच्या दिवशी १ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस “हरित वारी… आपल्या दारी” उपक्रमांद्वारे विठ्ठलरूपी वृक्षलागवड करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.

दरवर्षी लाखो भाविक आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायीवारी स्थगित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून “हरित वारी… आपल्या दारी” उपक्रमांद्वारे १००१ तुळशी झाडांचे वाटप व शहरात विविध ठिकाणी १० हजार झाडे लावण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यामध्ये सर्व नागरिका सह आजी माजी नगरसेवक, महिला व युवक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या उपक्रमाद्वारे “विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड” करुन ‘श्री विठ्ठल दर्शना’सह आषाढी एकादशी साजरी करावी, असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना आजार घाबरून जाण्यासारखा नसून आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली, स्वच्छता राखली, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास सामुदायिक शक्तीच्या जोरावर या संकटातून आपण निश्‍चितपणे बाहेर पडू त्यामुळे नागरिकांनी घरीच रहा सुरक्षित रहा असा संदेश पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील नागरिकांना देण्यात आला आहे.