Pune Gramin

आषाढीवारीतील वारकऱ्यांना सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By PCB Author

June 25, 2019

आळंदी, दि. २५ (पीसीबी) – पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत, या वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री  चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त  डॉ. अजित कुलकर्णी,  अभय टिळक आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, आषाढी वारी मार्गावर राष्ट्रीय सेवा योजनेचे ३५ हजारावर विद्यार्थी वृक्षारोपण करणार आहेत, वारकरी बांधवांना जेवणासाठी ५० लाखावर पत्रावळयांचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच वारी मार्गावर एक हजार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराच्या माध्यमातून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. रेनकोट, स्वच्छतागृहासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळते, ही समाधानाची बाब असल्याचे सांगून या आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून मदतीचेही कार्य विस्तारले जावे, शेगाव संस्थानच्या धर्तीवर काम उभे राहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री पाटील यांच्याकडे यावेळी देण्यात आला.

पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र आळंदी येथील गांधीवाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली.  या सोहळयास वारकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.