Sports

आशियाई विजेता माजी बॉक्सर डिंगको सिंगचे निधन

By PCB Author

June 10, 2021

नवी दिल्ली, दि.१० (पीसीबी) : आशियाई सुवर्णपदक विजेता आणि पद्मश्रीने सन्मानित माजी बॉक्सर डिंगको सिंग याचे कर्करोगाच्या दुर्धर आजाराने आज निधन झाले. तो ४२ वर्षाचा होता. मुळचा मणिपूरचा असणारा डिंगको गेले काही वर्षे कर्करोगाने आजारी होता. गेल्या वर्षी त्याला कोरोनाचा संसर्ग देखिल झाला होता.

डिंगकोने १९९८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्याच वर्षी त्याला अर्जुन पुरस्काराने गौरिवण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने त्याला पद्मश्री या नागरी पुरस्काराने देखिल सन्मानित केले होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर तो प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होता.

क्रीडा प्राधिकरणाच्या गुणवत्तेचा शोध मोहिमेतून डिंगको खेळाशी जोडला गेला होता. क्रीडा प्राधिकरणात आल्यावर मेजर ओ.पी. भाटिया यांनी त्याला घडवले. डिंगकोने १९८९ मध्ये कुमार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आणि तेथून तो बॉक्सर म्हणून खऱ्या अर्थाने नावारुपाला आला. त्या वेळेसस तो केवळ १० वर्षाचा होता. प्रशिक्षण घेऊन परिपूर्ण ठरलेल्या डिंगकोनो १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचवर्षी त्याने बॅंकॉक येथे किंग करंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने १९९८ मध्ये सुवर्ण कामगिरी केली. मात्र २००० ऑलिंपिक स्पर्धेत तो अपयशी ठरला. त्याच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपट देखिल येत असून, राज कृष्ण मेनन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, शाहिद कपूर डिंगकोची भूमिका बजावत आहे.