आशियाई क्रीडा स्पर्धा; २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनौबतचा ‘सुवर्ण’ वेध  

0
659

जकार्ता, दि. २२ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत  चौथ्या दिवस पुन्हा एकदा भारतीय नेमबाजांनी गाजवला आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबत हिने सुवर्णपदक  पटकावले आहे. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले अव्वल स्थान कायम ठेवले होते. मात्र,  शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले.

अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले,  त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाले. त्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदकावर आपले नावे  कोरले.

मात्र, याच प्रकारात भारताच्या १६ वर्षीय मनू भाकेरला पदकाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पात्रता फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करत पहिले स्थान कायम ठेवलेल्या मनूला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला संभाव्य एका पदकापासून मुकावे  लागले.