आळंदीत ४५ हजारांची घरफोडी

0
371

आळंदी, दि. १३ (पीसीबी) – घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि.११) सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदीतील मरकळ रोड येथील घरात घडली.

याप्रकरणी वीरेंद्र रामराव कोठारे (वय ५०, रा. आळंदी देवाची) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वीरेंद्र हे आळंदी मरकळ रोड येथील घरात राहतात. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटातील ३० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण चोरट्यांचा शोध घेत आहेत.