Pune

आळंदीत राणे पितापुत्रांचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध

By PCB Author

July 30, 2018

आळंदी, दि. ३० (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे या पितापुत्रांचा खटाटोप मराठा आरक्षणासाठी नसून वैयक्तिक कारणासाठी सुरू आहे. हे दोघे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचा नुसता आव आणत असून त्यांना मंत्रिपदाची लालसा लागून राहिली आहे, असा आरोप  आळंदीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला. तसेच या दोघांचा जाहीर निषेध करून कडकडीत बंद पाळण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा आंदोलनाबाबत दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. त्याचबरोबर आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप यावेळी करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आळंदीतील चाकणचौकातून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर प्रदक्षिणा रस्त्यावरून मोर्चा चावडी चौक, महाद्वार चौक आणि पालिका चौकात आणण्यात आला. यावेळी मरकळ चौक आणि पालिका चौकात मोर्चेकरांनी ठिय्या मारून रास्ता रोको केला.