आळंदीत मुलीला चिठ्ठी न दिल्याच्या रागातून टवाळखोराने १३ वर्षांच्या मुलाच्या अंगावर घातली भरधाव दुचाकी; मुलगा गंभीर जखमी

0
603

आळंदी, दि. १८ (पीसीबी) – मुलीला चिठ्ठी देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका दुचाकीस्वार तरुणाने १३ वर्षांच्या मुलाच्या अंगावर भरधाव दुचाकी घालून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास विश्वशांती केंद्र इंद्रायणी नदी घाटाजवळ घडली.

गणेश गजलवाड (वय १३, रा. हरिओम आश्रम, इंद्रायणीनगर, आळंदी) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे योगा प्रशिक्षक नवनित कुमार नानासाहेब देशमुख (वय ३५, रा. हरिओम आश्रम, इंद्रायणीनगर, आळंदी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार (एमएच/१२/सीव्ही/३३९९) या दुचाकीवरील इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख हे आळंदी येथील हरिओम आश्रमातील विद्यार्थ्यांना योगा शिकवतात. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते आश्रमातील गणेश गजलवाड आणि गोकुळ जाधव या दोघांना विश्वशांती केंद्र इंद्रायणी नदी घाटाजवळ घेऊन गेले होते. यावेळी तेथे काही तरुणी बसल्या होत्या. आरोपी तरुण देखील (एमएच/१२/सीव्ही/३३९९) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन तेथे पोहचला. त्याने त्याच्या जवळील एक चिठ्ठी गणेश याला त्या मुलींपैकी एकीला द्यायला सांगितली. मात्र गणेशने ती चिठ्ठी देण्यास नकार दिला. यावर रागावलेल्या तरुणाने त्याच्या ताब्यातील (एमएच/१२/सीव्ही/३३९९) या क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने आणुन गणेश याच्या अंगावर घातली. यामध्ये गणेश याचा हात फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उचार सुरु आहेत. दिघी पोलिस आरोपी दुचकीस्वाराचा शोध घेत आहेत.