आळंदीत माऊलींच्या पालखीदरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना अटक

0
452

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – माऊलींच्या पालखीदरम्यान गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी, पैसे, पाकीट आणि मौल्यवाण वस्तूंची चोरी करणाऱ्या पाच सराईत चोरट्यांना गुन्हा शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे.

किरण अजिनाथ गायकवाड (वय १९, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड), पप्पू अमृत जाधव (वय ३०, रा. महेंद्रगिरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), अमोल बाबासाहेब गित्ते (वय २३, रा. लोहगाव, खांडगाव, पाथर्डी, जि. अहमदनगर), जगना बंडू नायक (वय३०, रा. ओडिसा), अनिल नागराव ढगे (वय३९, रा. गणेशनगर, नांदेड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल होतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी पाचही आरोपी चोरटे आळंदीत आले होते. मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी त्याचा हा कट हाणुन पाडत पाचही आरोपींना अटक केली. आरोपींकडून एक चोरीचे पाकीट आणि १ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. यावरून पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, अटक केलेल्या पाचही आरोपींची माहिती मागवली असता त्यांच्यावर चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे उघडकीस आले. तसेच जगना बंडू नायक या आरोपी विरोधात महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात एकूण १८ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आळंदी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.