Bhosari

आळंदीत दिवसाढवळ्या थरार; सराईतावर कोयत्याने सपासप वार

By PCB Author

May 19, 2019

आळंदी, दि. १९ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून दोन ते तीन जणांच्या टोळक्यांनी एका सराईत गुंडावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही थरारक घटना आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर घडली.

लंकेश ठाकूर (वय ३०) असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चारच्या सुमारास लंकेश हा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर आला होता. यावेळी अज्ञात दोन ते तीन जणांच्या टोळक्यांनी त्याच्या मानेवर आणि छातीवर वार करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर लंकेश याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर लंकेश सराईत गुन्हेगार असल्याने पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आळंदी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.