Bhosari

आळंदीत जमिनीसाठी वृद्धेचे अपहरण करून फसवणूक 

By PCB Author

November 05, 2018

आळंदी, दि. ५ (पीसीबी) – वडिलोपार्जित जमिनीसाठी न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी एका अशिक्षित वृद्धेचे अपहरण करून दमदाटी करीत तिची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १२ ते २७ सप्टेंबर दरम्यान घडली.

पार्वती शंकर ऊर्फ बबन भाडाळे (वय ६८, रा. पंडित दौंडकर यांची खोली, आळंदी) असे फसवणूक झालेल्या वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात नातेवाईक, बांधकाम व्यावसायिक आणि एका वकिलाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुनील शंकर बांदल, पुराणिक बिल्डर प्रा. लि., पोंक्षे वकील आणि इतर साथीदार (नाव पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती भाडाळे यांची बावधन येथे वडिलोपार्जित जमिन आहे. या जमिनीचे वाटप झाले नसतानाही पार्वती आणि त्यांची मामे बहीण शैलाबाई कुऱ्हे याची संमती न घेता जमिनीची पुराणिक बिल्डर प्रा. लि. परस्पर विक्री केली. याबाबत पार्वती आणि शैलाबाई यांनी मालकी हक्‍काबाबत न्यायालयात दावा दाखल केला. पार्वती यांना मूलबाळ नसल्याने शैलाबाई यांचा मुलगा गणेश कुऱ्हे त्यांची देखभाल करतो. तसेच न्यायालयाचे कामही तोच पाहतो. पार्वती ह्या आळंदी येथील घरी असताना १२ आणि २७ सप्टेंबर दरम्यान त्यांचा मामेभाऊ सुनील बांदल घरी आला. गणेश कुऱ्हे हा मुंबईला गेला असून त्याने तुला शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायला सांगितले असल्याचे खोटे सांगून जबरदस्तीने मोटारीतून न्यायालयात नेले. त्यांनी येण्यास नकार दिला असता त्यांना दमदाटीही केली. पार्वती या अशिक्षित असल्याने त्यांच्या काही कागदांवर स्वाक्षरी घेतल्या. असे त्याने दोनवेळा केले व न्यायालयातून दावा मागे घेण्यासाठी खोटे तडजोड व प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पार्वती यांनी आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.