Bhosari

आळंदीत चोरुन बडीशेप घेणाऱ्याला हटकल्याने दोघा भावांच्या डोक्यात दगड मारुन जबर मारहाण

By PCB Author

June 05, 2019

आळंदी, दि. ५ (पीसीबी) – टपरीतील बडीशेपच्या पुड्या चोरुन खिश्यात टाकत असताना हटकल्याने टपरीचालक आणि त्यांच्या भावाला तिघाजणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातांवर दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.३) रात्री आठच्या सुमारास आळंदी मरकळ रोडवरील धानोरे पॉलीबॉन्ड या कंपनीजवळील टपरीसमोर घडली.

याप्रकरणी टपरीचालक चंद्रशेखर भरत रॉय (वय २५, रा. पॉलीबॉन्ड कंपनीजवळील, गव्हाणेचाळ, धानोरे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश गावडे (रा. सोळु) आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची आळंदी मरकळ रोडवरील धानोरे पॉलीबॉन्ड कंपनीजवळ पानाची टपरी आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी आकाश हा टपरीजवळ आला त्याने टपरीतील बडीशेपच्या पुड्या चोरुन शिश्यात घातल्या. हे पाहून चंद्रशेखरने त्याला हटकले. यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. काही वेळेत आकाशने त्याचे दोन मित्र बोलवून घेतले. तसेच तिघांनी मिळून चंद्रशेखर आणि त्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातांवर दगड मारुन गंभीर जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.