Bhosari

आळंदीत खंडणीसाठी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी

By PCB Author

March 21, 2019

आळंदी, दि. २१ (पीसीबी) – ‘तुझ्या खोल्या भाड्याने आहेत. तू मला ५० हजार दे किंवा दर महिन्याला तीन हजार रुपये हप्ता दे. नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही.’ असे एका ज्येष्ठ नागरिकाला घरात घुसून धमकावले आणि मारहाण करत जीवेमारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. २०) सकाळी साडेआठच्या सुमारास गोपाळपुरा आळंदी येथे घडली.

याप्रकरणी रामदास वामन बनसोडे (वय ६३, रा. गोपाळपुरा, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर उर्फ दिग्या विठ्ठल कदम (रा. गोपाळपुरा, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक रामदास बनसोडे यांच्या गोपाळपुरा आळंदी येथे काही खोल्या आहेत. त्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बनसोडे आणि त्यांच्या पत्नी घरात असताना आरोपी दिग्या जबरदस्ती त्यांच्या घरात घुसला. आणि ‘तुझ्या खोल्या भाड्याने आहेत. तू मला ५० हजार दे किंवा दर महिन्याला तीन हजार रुपये हप्ता दे. नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही.’ अशी धमकी दिली. तसेच त्यांना मारहाण केली. बनसोडे यांचा भाडेकरू सुनील चेके यांना देखील ‘बनसोडे यांचा खून करणार आहे, त्यांच्यासोबत गाडीवर फिरू नकोस’ असे सांगितले. याप्रकरणी दिग्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिग्या सध्या फरार आहे. आळंदी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.