आळंदीत कोयत्याने वार करुन पेंटरला लुटले

0
954

आळंदी, दि. ६ (पीसीबी) – आळंदीतील इंद्रायणी नदी पात्रात शौचास गेलेल्या एका पेंटरवर कोयत्याने वार करुन त्यांच्याजवळील १० हजार रोख आणि ४ हजार ६०० रुपयांचा एक मोबाईल असा एकूण १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना आळंदीतील मातंग समाज धर्मशाळेसमोरील इंद्रायणी नदी पात्रात बुधवारी (दि.५) सकाळी पावनेआठच्या सुमारास घडली.

हरिदास सुभाष सुर्यवंशी (वय ३७, रा. पडाळवाडी थिगळ स्थळजवळ, ता. खेड जि. पुणे) असे कोयत्याचा वार करुन लुटण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिदास हे पेंटर आहेत. बुधवारी सकाळी पावनेआठच्या सुमारास ते आळंदीतील मातंग समाज धर्मशाळेसमोरील इंद्रायणी नदी पात्रात शौचास गेले होते. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या तिघा चोरट्यांनी हरिदास यांच्या गळ्याला कोयता लावून, “ तुझ्याकडे काय आहे ते दे” हरिदास यांनी त्यांच्याजवळील ऐवज देण्यात नकार दिला. इतक्या तिघा आरोपींपैकी एकाने त्यांच्या खिशातील १० हजार रोख आणि ४ हजार ६०० रुपयांचा एक मोबाईल असा एकूण १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यादरम्यान आरोपींमध्ये आणि हरिदास यांच्यात झटापट सुरु झाली. आणि तिघा आरोपींमधील एकाने हरिदास यांच्या डाव्या पायाच्या टाचेवर कोयत्याने वार करुन जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.