आळंदीतील हॉटेल चालकास मारहाण करणाऱ्या तिघा पोलिसांची उचलबांगडी

0
3033

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – आळंदीतील हॉटेल वैभव पॅलेसच्या चालकाला ५० हजारांची खंडणी न दिल्याच्या रागातून दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी  मालकासह तेथील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (दि.७) रात्री जबर मारहाण केली. याप्रकरणी तिघा पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करुन वरिष्ठ पोलिसांनी त्यांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात केली.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दिघी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कदम, पोलिस शिपाई महेश खांडे, कोकणे, महिला उपनिरीक्षक दशवंत हे आळंदीतील हॉटेल वैभव पॅलेसमध्ये गेले होते. तेथे त्यांनी हॉटेल चालक अवधूत गाढवे, लिंगराज गौडा आणि विशाल गिरी यांना जबर मारहाण करुन ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली. मात्र गौडा याने पैसे देण्यास नकार दिल्याने गौडा यांच्या खिशातील रोख १९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान शनिवारी घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज शहर परिसरात व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. तसेच तिघा पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने त्या तिघांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली.