Notifications

पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान महागडया, आलिशान हॉटेलऐवजी अमेरिकेत राजदुताच्या घरी राहणार?

By PCB Author

July 08, 2019

नवी दिल्ली, ८ (पीसीबी) – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका दौऱ्यात महागडया, आलिशान हॉटेलऐवजी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी राजदुताच्या निवासस्थानी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. २१ जुलैपासून इम्रान खान यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याला सुरुवात होत आहे.

अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद माजीद खान यांच्या निवासस्थानी राहिल्यास दौऱ्याच खर्च कमी होऊ शकतो असे डॉन न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सन्मानीय अतिथी अमेरिकेत पोहोचल्यानंतर सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसवर त्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी असते. या दौऱ्याचा वॉशिंग्टनच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी शहर प्रशासनाची असते.

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे जागतिक आर्थिक संस्थांकडून मदत मिळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेगवेगळया उपायोजना केल्या असून हॉटेलऐवजी राजदुताच्या निवासस्थानी राहणे हा सुद्धा त्याच उपायोजनांचा भाग आहे. वॉशिंग्टनमध्ये दरवर्षी शेकडो पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष येत असतात. वॉशिंग्टनमधील वाहतुकीला याचा फटका बसणा नाही यासाठी अमेरिकन फेडरल सरकार शहर प्रशासनासोबत मिळून काम करते.