“आर्यनची इच्छा असेल तर तो पूर्ण जहाज खरेदी करु शकतो. मग तो ड्रग्स का विकेल?”; आर्यनच्या वकिलांनी मांडले १० मोठे मुद्दे

0
781

मुंबई, दि.०५ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीप्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई-गोवा क्रूजवर 2 ऑक्टोबरच्या रात्री NCB ने धाड टाकून, आर्यन खानच्या पार्टीतील ड्रग्जचा भांडाफोड केला. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यावेळी NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांनी आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तर आर्यन खानकडून वकील सतीश मानेशिंदेयांनी युक्तीवाद केला.

ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला काल 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.

मानेशिंदेंनी नक्की काय दावा केला आहे?
आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतिश मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं.

सतीश मानेशिंदे यांनी पुढील युक्तीवाद मांडले; –
1. सतीश मानेशिंदे : (आर्यन खान) मला माहिती नाही मला कोणती जागा देण्यात आली आहे, मी जहाजासाठी एक पैसाही आयोजकांना दिला नाही, मी आयोजकांपैकी एकालाही ओळखत नाही.

2. सतीश मानेशिंदे : माझ्या मोबाईलशिवाय माझी एकही वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. माझ्या मित्रांना यासाठी अटक करण्यात आलं कारण त्यांच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळालं होतं. माझा त्याच्याशी अजिबात संबंध नाही.

3. सतीश मानेशिंदे : माझ्याकडे कोणतेही ड्रग सापडलं नाही, ते दुसऱ्यांकडे मिळालं. त्यामुळे मला त्याच्याशी जोडता येणार नाही.

4. सतीश मानेशिंदे : माझ्या चौकशीत माझे व्हॉट्सअॅप चॅट डाऊनलोड करण्यात आले आहे. जेव्हा मी परदेशात होतो, तेव्हा माझ्या चॅटमधून आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगचे संकेत देतात असा त्यांचा दावा आहे. मी परदेशात होतो तेव्हा मी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सची तस्करी, खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी नव्हतो.

5. सतीश मानेशिंदे : माझ्या चॅटमधून, फोटोंमधून मी कोणत्याही ड्रग्जप्रकरणात सहभागी असल्याचं सिद्ध होत नाही. जर माझ्या चॅटमधून ड्रग्ज तस्करीचे संकेत दिसत असतील तर त्याबाबत पाहिलं जाऊ शकतं. मात्र तसे कोणतेही संकेत दिसत नाहीत.

6. सतीश मानेशिंदे : माझा जामीन आणि रिमांडबाबत विचार होऊ शकतो. रिकव्हरी किंवा जप्तीची आवश्यकता नाही. पुढच्या अटकेच्या कारवाईसाठी कोणताही आधार नाही.

7. सतीश मानेशिंदे : ड्रग्ज खरेदी केलं किंवा विकलं याचे कोणतेही पुरावे नाहीत. मी एक 24 वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं यापूर्वीचं कोणतंही गुन्हेगारीचं रेकॉर्ड नाही. दुसऱ्यांनी काय केलं ते माझ्यावर थोपवलं जाऊ शकत नाही.

8. सतीश मानेशिंदे : 48 तासानंतरही माझ्याकडून काहीही मिळालं नाही. माझी जी काही चौकशी करायची होती, ती केली. मी त्यासाठी पूर्ण सहकार्य केलं. त्यांनीही माझ्याशी योग्य वर्तन केलं. मी काहीही डिलीट केलेलं नाही.

9. यादरम्यान सतीश मानेशिंदे आणि अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. अनिल सिंह म्हणाले, तो त्या जहाजावर का गेला होता? त्याला उत्तर देताना मानेशिंदे म्हणाले, तो तिथे होता याचा अर्थ असा नाही की आर्यन तिथे ड्रग्ज विकत होता, जर त्याची इच्छा असेल तर तो पूर्ण जहाज खरेदी करु शकेल.

10. सतीश मानेशिंदे : आर्यनविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. जहाजावर अन्य 1000 लोक होते, त्यांचीही चौकशी करा.