Pimpri

आर्मीमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणाचा तपास करणार ‘एसआयटी’

By PCB Author

January 09, 2022

– आर्मीतील बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यातील दोघेजण आर्मीमधून निवृत्त झाले आहेत. या प्रकरणात आर्मीतील आणखी बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) करणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक डाॅ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे या अधिकाऱ्यांची ही एसआयटी बनविण्यात आली आहे.

सतीश कुंडलिक डहाणे (वय 40, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, जि. अकोला) या तिघांना फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली. आर्मी इंटेलिजन्सने याप्रकरणी तीन संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत असल्याचे समोर आले. यात ‘आर्मी’मधील बड्या अधिकाऱ्यांचा समोवश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तपासासाठी आर्मी इंटेलिजन्स देखील सहकार्य करणार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. एसआयटी कडून या फसवणूक प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.