Desh

आर्थिक व्यवहार आपल्या सेवकांकडे द्यावेत; भय्यू महाराजांच्या पॉकेट डायरीत नोंद

By PCB Author

June 13, 2018

इंदूर, दि. १३ (पीसीबी) – अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. आपले सर्व आर्थिक व्यवहार आपला सेवक विनायककडे द्यावेत, अशी इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. भय्यू महाराज यांनी आपल्या पॉकेट डायरीत ही नोंद केली आहे.

विनायक हा भय्युजी महाराज यांचा अतिशय विश्वासू सेवक होता. मागील १५ ते १६ वर्षापासून तो त्यांच्यासोबत होता. त्यांची अनेक कामे करणे तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम तो करत होता. त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना डावलून महाराजांनी आर्थिक व्यवहार सेवकाकडे देण्याची  इच्छा व्यक्त केल्याने शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर आणखीही काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कौटुंबिक वाद आणि तणाव हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.