समृद्ध जीवन चिटफंड कंपनी द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे महेश मोतेवार याच्या मुलासह एकाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (दि.१२) अटक केली आहे. गुंतवणुकदारांना ज्यादा पैशांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अधिक तपासासाठी १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा़. गणराज हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) हा समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचे मालक महेश मोतेवार याचा मुलगा आहे. तर कंपनीचे संचालक प्रसाद किशोर पारसवार (वय ३२, रा़. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) या दोघांनाही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

सध्या महेश मोतेवार आणि त्यांची पत्नी अटक आहेत. समृद्ध जीवनचे संचालक महेश मोतेवार यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते. सेबीनेही त्यांच्यावर बाजारातून पैसे गोळा करण्यावर निर्बंध घातले होते. त्यानंतरही कंपनीने ठेवी स्वीकारल्या. सेबीच्या तक्रारीवरून मोतेवारसह इतरांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि ओरिसामधील चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने समृद्ध जीवनच्या सर्व कंपन्या आणि कार्यालयांना टाळे ठोकले आहे.