आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल का? केंद्रात खलबते सुरु

0
520

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – आरक्षणाच्या आंदोलनांमुळे राज्य आणि केंद्र सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मोदी सरकारने आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल का? या पर्यायावर केंद्रात खलबते सुरु झाली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात मराठा आंदोलन, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट, राजस्थानात गुर्जर अशा आंदोलनामुळे  देशभर वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलली असून आता आरक्षणाच्या पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे.

सर्व जातींमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचा विचार सुरु आहे. सध्या केवळ प्राथमिक स्वरुपात हा पर्याय समोर आला आहे. यावर अजून चर्चेला सुरुवात झाली नाही. मोदी सरकारकडून केवळ या पर्यायाची चाचपणी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी घटनात्मक बदल करावा लागणार आहे. मात्र, घटनात्मक बदल करणे अवघड काम आहे. दोन तृतीयांश खासदारांची संमती मिळाली तरच घटनात्मक बदल केला जाऊ शकतो.  मात्र, ती संमती मिळवण्यात मोदी सरकारला यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.