आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये म्हणून गिरीश बापट यांनी खासदार निधीतून दिला ५० लाखांचा निधी

0
478

 

पुणे, दि.२८ (पीसीबी) – जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट खासदार निधीतून त्यांनी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आज याबाबतचे पत्र सुपूर्त केले.

खासदारपदाचे एक महिन्याचे वेतनही बापट यांनी पक्षाला या उपायांसाठी दिले आहे.

कोरोना या महाभयंकर आजारामुळे जग थांबले आहे. जगभरात दररोज हजारो जण या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या खबरदारीतून हा आजार आटोक्यात राहण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या जीवघेण्या आजारातून सावरण्यासाठी मोदी यांनी आवाहन केल्याने अनेक मदतीचे पुढे येत आहेत.

सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी ही आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क तसेच इतर आवश्यक साधने, रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठीच बापट यांनी खासदार निधीतून ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, तसेच अनेक स्वयंसेवी संस्था विविध सामाजिक उपक्रमातून मदतीसाठी पुढे येत आहेत. ‘लॉकडाऊन’ मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थांना तसेच गरजूंना जेवण देऊन, रक्तदान करून, नागरिकांना औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या प्रमाणे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अर्थसहाय्य करून माणुसकीचा हात पुढे करावा असे आवाहन बापट यांनी केले आहे.

यावेळी भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.