Pimpri

आरोग्य निरीक्षकावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू – शिवसेना

By PCB Author

June 20, 2019

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मनमानी कारभार करून नागरिकांना आवश्यक सोयी सुविधापासून वंचित ठेवणाऱ्या आरोग्य निरीक्षकावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निेवेदनात दिला आहे.

शिवसेनेचे विभाग उपप्रमुख शेखर महाडिक यांनी आयुक्तांना दिलेल्या निेवेदनात म्हटले आहे की,    पिंपरी येथील प्रभाग क्रमांक २१ मधील जिजामाता हॉस्पीटल येथे शांताराम माने हे आरोग्य निरीक्षक म्हणून जेव्हापासून रूजू झाले आहेत. तेव्हापासून या भागातील मिलिंदनगर, आदर्शनगर, सुभाषनगर, सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या परिसरात घाणीचे साम्राज्य  पसरले आहे.या परिसरात मागासवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात.

येथील असुविधांबाबत माने यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत. तसेच सारथी हेल्पलाईनवरी तक्रार देऊनही याचे निवारण केले जात नाही. या परिसरातील कचरा उचलणे, साफसफाई करणे, नालेसाफ करणे, राडारोडा उचलणे, आदी कामांबाबत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. पण या तक्रारींचे निवारण केले जात नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे माने यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेखर महाडिक यांनी या निवेदनात दिला आहे.