Maharashtra

#आरे  “लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?”

By PCB Author

October 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आरे प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आता लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आरे मध्ये वृक्षतोड शुक्रवारी रात्री करण्यात आली. त्यानंतर आंदोलन उभे राहिले. आंदोलक जंगल वाचवण्यासाठी पुढे आले. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु केले. याचप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला. “एखादी गोष्ट घडली की ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणे सोडून दिले आहे का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही का? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरुन श्वसन करतात का?” असे प्रश्न विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईतील आरे परिसरात वृक्षतोड करण्यात आली. त्यानंतर आरे वाचवा म्हणत अनेक आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. मात्र या प्रकरणात २९ आंदोलकांना अटक कऱण्यात आली. तसेच आरे भागात जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे. लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या सगळ्या कारवाईचा, प्रशासनाचा जनतेने, आंदोलकांनी राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही या सगळ्याचा निषेध नोंदवला असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, कलाकार गप्प का? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर कार्बन डायऑक्साईड वापरुन श्वसन करतात का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

विश्वंभर चौधरी यांनी या पोस्टच्या आधी एक पोस्ट करुन अश्विनी भिडे खोटं बोलत असल्याचाही आरोप केला आहे. त्या पोस्टवरही अनेक नेटकऱ्यांनी त्यांना उत्तरे दिली आहेत. अगदी त्याचप्रमाणे या पोस्टवरही नेटकरी व्यक्त झाले आहेत.