Maharashtra

आरेतील झाडे तोडणाऱ्यांचे काय करायचं? ते निवडणुकीनंतर ठरवू – उध्दव ठाकरे

By PCB Author

October 05, 2019

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मी आरे संदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहे,  असे सांगून निवडणूक संपल्यानंतर आमचे सरकार येणार आहे.  त्यानंतर  झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं? ते आम्ही  ठरवू, असे   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर, कुणबी, माळी,  तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी  चर्चा केली.  त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरेतील मेट्रोच्या कारशेडसाठी शुक्रवारी रात्री ४०० झाडांची कत्तल करण्यात आली. यावरून सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही झाडे तोडणाऱ्या अधिकारी यांनी पीओकेत पाठवा, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

आरेतील वृक्षतोडीबाबत उध्दव ठाकरे यांना विचारले असता निवडणूक संपल्यानंतर आमचे सरकार येणार आहे.  त्यानंतर  झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं? ते आम्ही  ठरवू, असा इशारा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेने आरेतील वृक्षतोडीला सुरूवातीपासून कडाडून विरोध दर्शवला आहे. तर सत्ताधारी भाजपने वृक्षतोडीस समर्थन केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.