Maharashtra

आरपीआयमधून लढा; खासदार उदयनराजेंना रामदास आठवलेंची ऑफर

By PCB Author

October 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यास स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. हाच धागा पकडत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उदयनराजेंना ऑफर दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास रिपाइंकडून लढावे, असे आठले यांनी म्हटले आहे.    

मुंबईत बोलताना आठवले म्हणाले की, उदयनराजेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्या जागी श्रीनिवास पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी उदयनराजेंना विनंती करतो, त्यांनी आमच्या पक्षात यावे. आम्ही उदयनराजेंना निवडून आणू,असे ते म्हणाले. तसेच यासंदर्भात त्यांना फोन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली आहे. मात्र, शिवसेनासोबत आल्यास लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही दोन जागांची मागणी करणार आहे. शिवसेना सोबत आली नाही तर चार जागांची मागणी करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.  तसेच युती झाल्यास पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला आणि मला दक्षिण-मध्य मुंबईची जागा देण्यास  कोणतीच हरकत नाही, असेही ते म्हणाले.